Monday, December 24, 2012


कस असत न ! एका अनपेक्षित वळणावर अचानक गजबजलेल्या अनोळख्या गर्दीत कोणीतरी ओळखीच भेटाव आणि मग सुरवातीची औपचारिक ओळख हळूहळू गप्पात बदलायला लागते ....स्वतःची माहिती देण घेण, मग विचार, अपेक्षा आणि क्वचित स्वप्न नकळत एकमेकांना सांगितली जातात....त्यातून मग सुरु होतो एक प्रवास ....अनोळखीतून ओळखीकडे जाणारा ...नंतर मैत्रीतून प्रेमाकडे आणि मग थेट लग्नाकडे नेणारा प्रवास......थोड कठीणच असत न ! अनोळखी माणसाला समजून जाणून मग त्याला आपल्या भावी जोडीदाराच्या अपेक्षेत बसवण, बघण आणि मग स्विकारण....मजेशीर असत न ! कधी मग स्वभाव जाणून घेता घेता आपला स्वभाव दुसर्यावर लादलाही जातो नंतर एकमेकांनुसार स्वभावात बदलही होतात आणि मग अनोळखी गोष्टी ओळखीच्या होतात ....

तो सैरभैर होऊन संपूर्ण लेडीज डब्बा शोधत होता ...त्याने दिवसभरात कमावलेले साडे नऊशे रुपये त्याच्याकडून चक्क हरवले होते..तो प्रत्येक बाकाखाली वेड्यासारखा सारखा सारखा शोधत होता....आता तर त्याला रडूच कोसळले आणि एकटाच वेड्या सारखा बडबडत होता," आज कि कमाई के पैसे थे सारे..कल का माल कैसे खरीदुंगा?" कपाळावर हात मारून रडायलाच लागला...गाडीतल्याच बायांना शेवटी त्याची दया आली आणि त्यांनीच मग थोडे पैसे जमा केले आणि त्याच्या हातात बळजबरीने पैसे ठेवले, म्हणाल्या " उद्याचा माल घे या पैशांनी..." याच का त्या बाईका ज्या डब्ब्यात येणाऱ्या विक्रेत्यामुळे त्रासलेल्या असतात.."आम्ही कसे बसे चवथ्या सीटवर बसतो आणि त्यात हे मेले सारखे ये जा करत असतात." म्हणून ओरडत असतात. नाहीतर पाच रुपयांसाठीही विक्रेत्याबरोबर हुज्जत घालत असतात याच का त्या बाईका ? ..त्या वेळी गम्मत वाटली मला त्यांची.. या वेळ आल्यावर दयाळूही होऊ शकतात तर!! पण तो मुलगा? तो खरच बोलत होता का नाटक करत होता पैशांसाठी? राहून राहून सारखा मनात तेच येत होत..तो जर खरच बोलत असेल तर त्याला आज लेडीज डब्ब्यात देवच भेटला म्हणायचा नाहीतर त्याच्या खोटारडेपणामुळे या बाईकांनी आज एका चुकीच्या माणसाला मदत केली असंच समजायचं... काही का होईना!! अजूनही माणुसकी शिल्लक आहे याची जाणीव झाली आज !!

जग किती छोट असत न.... गर्दीतही काही चेहरे ओळख दाखवणारे तर काही ओळख लपवणारे दिसतात ...गर्दीतले काही गंध , स्पर्श नकोसे वाटतात तर काही हवेहवेसे जुनी आठवणं पुन्हा ताजी करून जाणारे असतात. किती दूर गेले तरी फिरून पुन्हा एका अनोळख्या वळणावर असे काही जुने ओळखीचे चेहरे समोर येतात....आणि काहीसे अस्वस्थ करून जातात ... सगळ्यांच्याच आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात ज्यांना तुम्ही कधीही कितीही दिवसांनी भेटलात तरी खूप छान वाटते, त्यांना पुन्हा पुन्हा भेटावेसे वाटते तर काही असेही असतात ज्यांना आपण दुरून पहिले तरी आपण स्वतःच त्यांच्यापासून लांब जातो ...खरतर आपल्याला काही लोकांच्या प्रश्नांची उत्तर द्यायची नसतात म्हणून जाणून बुजून आपणच स्वतःला गर्दीचा एक भाग बनवून टाकतो ....

माणूस आणि त्याच मन फारच स्वार्थी आहे. त्याला नेहमीच हव असत काहीतरी ...अगदी मनासारखं.... अन नाही मिळाल तर ते जग त्याच्यासाठी स्वार्थी बनून जाते... खरचं का नेहमीच मनाप्रमाणे झाल तरच आनंद होतो? कधीतरी निस्वार्थपणे दिल्याने सुद्धा फार छान वाटते. नाही का? अन कसलीच अपेक्षा न ठेवता जे दिल जात ते जास्त आनंद देत मनाला .. खरच कधीतरी असंही करून बघावं..अन मनसोक्त आनंद घ्यावा त्या क्षणांचा ...तेवढ्याच निस्वार्थपणे !!

आयुष्यात येणारे सारेच प्रश्न कसे किचकट असतात नाही !! उगाच त्यांच्या विचाराने डोक्याचा फार भुगा होऊन जातो ... मग ठरवूनही हा गुंता काही केल्या सुटत नाही ..पण खरचं का हे प्रश्न एवढे किचकट असतात ? ज्यांचा आपण एवढा त्रास करून घेतो ? आणि दिवस रात्र त्यांच्या विचारात घालवत असतो? आयुष्यात येणाऱ्या साऱ्याच प्रश्नांची उत्तर तशी पहिली तर फार सरळ असतात ..फक्त "हो" किंवा "नाही" या दोन शब्दातच ती सामावलेली असतात ..मग कशाला उगाच आयुष्य या प्रश्नात हरवून टाकावं....नाही का?

कशी असते न नियती !! नेहमीच कशी मोजूनमापून देते साऱ्या गोष्टी ...सगळ्यांनाच नेहमी हातच राखून देते ती...कोणाला माणस देते तर प्रेम देत नाही , कुणाला प्रेम देते तर सहवास देत नाही, कुणाला अमाप पैसा देते तर सुखाची झोप देत नाही , नेहमीच "दात आहे अन चणे नाही अन चणे आहेत अन दात नाहीत" अशीच काहीशी परिस्थिती असते ... का कुणाला त्याच्या मनासारख्या गोष्टी नाही मिळत ...नेहमीच का अपूर्ण - अधुऱ्या गोष्टी मिळतात ? कदाचित आपल्या जवळ असलेल्या गोष्टींची किंमत वाटावी म्हणून असेल ... सहज मिळालेल्या गोष्टींना फारशी किंमत नसते अन अशाच मेहनतीने मिळालेल्या गोष्टी टिकवून ठेवण्यासाठीच कदाचित हि नियती त्या गोष्टी अपूर्ण ठेवते .... माझ्या प्रश्नानसारख्या ......

आयुष्यात कोणत्याच गोष्टी कधीही परिपूर्ण नसतात तरीही आपण आयुष्य परिपूर्ण असाव असा हव्यास का धरतो ? सगळ्याच गोष्टी काही मनासारख्या होऊ नाही शकत हे माहित असूनही आपण का सगळ्या गोष्टी मनासारख्या करण्याच्या प्रयत्नांत असतो ? सगळ्याच प्रश्नांची उत्तर काही नेहमीच सापडत नाहीत तरीही आपण का काही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो ? आठवणी कधीही विसरता येत नाहीत तरीही आपण त्या का उगाच विसरण्याच्या प्रयत्नांत पुन्हा पुन्हा आठवत असतो ? मागे निघून गेले क्षण पुन्हा मिळवणे अशक्य असते तरीही आपण का त्याच क्षणांच्या शोधात फिरत असतो ? आयुष्य इतक सुंदर असतानाही आपण का ते अश्रूंनी भिजवत असतो ? सगळ्याच प्रश्नांची उत्तर माहित असूनही आपण का उगाच त्या उत्तरांच्या शोधात असतो ? किती विचित्र असतात न काही गोष्टी .......कधी कधी सार काही कळत असूनही वळत का नाही ?